Friday, June 25, 2010

हॉर्ससिक...


आम्ही उटीला गेलो होतो .छोटी केतकी आणि तिचे आई बाबा म्हणजे इंदु मॅडम आणि सुरेश सर पण आमच्या बरोबर होते ,तिच्या आई कडून समजलं की तिला उटीला गेलं की नावेत आणि घोड्यावर बसायला खूप आवडतं. आणि खरच की बोटिंगनंतर लगेच ते हॉर्स रायडिंग साठी गेले.आणि सुरेश सरांनी मला आणि मेघनाला विचारलं"तुम्हाला पण बसायचय का घोड्यावर?". आम्ही दोघीही नाही म्हणालो, मला माहीत नाही मेघना का नाही म्हणाली ते,परंतु मला तर बिलकूल आवडत नव्ह्तं.आवडत नाही असं नाही पण खुप आवडतं असही नाही. आमच्या गावात दरवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी पालखी येते, आणि त्या पालखीतला तो पांढरा शुभ्र घोडा त्या रात्री आमच्या घरीच बांधतात परंतु मला कधीच त्यावर बसण्याची इच्छा झाली नाही. पण त्यादिवशी हॉर्स रायडिंगसाठी असलेली गर्दी पाहून कधी नव्हे पण थोड्यावेळासाठी का होईना पण मलाही घोड्यावर बसण्याची इच्छा झाली. तेव्हापासून घोडाच काय पण खेचर आणि गाढवं पण आवडायला लागलीत. आणि ते बालपणीचे दिवस आठवायला लागले. अशीच इच्छा मी १०-१२ वर्षांची असताना झाली असती तर किती बर झालं असतं.वराती मागून घोडे म्हणण्यापेक्षा घोड्यानंतर इच्छा, अशी इच्छा काय उपयोगाची?
माझ्या जन्माच्या अगोदर पासून आमच्याकडे एक घोडा होता. घोडा नाही- मैनी नावाची घोडी होती. खूप छान होती तपकिरी रंगाची अगदी दणकट. पणजोबा ,भाऊ(आजोबा) आणि बापू(वडिल) कुठे गावाला जायचं असेल किंवा वाळकीला बाजार असेल तर तिच्यावर बसून जायचे.आमच्याकडे टांगापण होता त्यावेळेस आणि मोडलेल्या स्थितीत अजूनपण आहे.वडिल लहान म्हणजे ९-१० वर्षाचे असताना आत्याच्या गावावरून (३०-४०कि.मी) घोडीवर बसून एकटे आलेले ,माझ्या वडलांना रस्ता माहीत नव्हता परंतु मैनीला माहीत होता,त्यामुळे ते व्यवस्थित घरी पोहोचले.आणखी एक गोष्ट वडिल सांगतात ती म्हणजे, माझा चुलता आणि आत्या त्यांच्या लहानपणी गुरांमागे जायचे,एके दिवशी चुलत्यांनी घरी आजोबांना घोडीच्या शेपटीचे केस कापून आकार देतांना पाहिलं असावं,लहान मुलानां कोण हात लावून देतं अशा कामाला? मग त्याच दिवशी गुरांमागे ते कात्री घेऊन गेले आणि घोडीचे केस कापण्याची हौस आत्याचे लांबलचक केस कापून पूर्ण केली. थोडेथिडके केस नव्हते कापले, पूर्ण टक्कलच केल होतं. त्याचा अजुनही आत्याच्या केसांवर प्रभाव आहे. आणि त्यानंतर नानाला जी काही बोलणी बसली ती पाहून नंतर असे प्रयोग कोणीच कोणावर केले नाही.
जेव्हा आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ वेगळं निघाले तेव्हा वाटणीमध्ये मैनी म्हणजे घोडी आमच्याकडे आली. तेव्हा मला जस कळतय तसं तिला काहीही खास काम करावं लागायच असं मला नाही आठवत. हो परंतु एक गोष्ट कशी विसरेल. जेंव्हा लहान असतानां आईबरोबर शेतात जायचे,जातानां नेहमी आई बरोबर जायचे ,परंतु घरी येताना माझा नंबर लागायचा तो म्हणजे आजोबां बरोबर .एकतर ते आणि मी घोडीवर बसून जायचो, नाहीतर ते मला त्यांच्या खांद्यावर बसवुन घरी घेऊन जायचे. मला घोड्यावर बसण्यापेक्षा खांद्यावर बसायलाच जास्त आवडायचं.कारण की घोडीची कडक पाठ मला बिलकुल आवडायची नाही आणि खूप उंच असल्यामुळे पडायची भीती पण वाटायची.
आणि दुसरीकडे आजोबांचा खांद्यावर काय भारी वाटायचं! नंतर नंतर म्हणजे ३ री-४ थीत असताना आणखी एका गोष्टीची भर म्हणजे एकदा माझ्या १-२ मैत्रिणिंनी मला घोडीवरुन घरी येतानां पाहिलेल आणि हसल्यासुद्धा तेव्हापासून मी घोडिवर बसायचच सोडून दिलं. घोडी आणि बैलगाडी असे दोन पर्याय असतील तर मी बैलगाडीकडेच पळायचे.
अशाप्रकारे मैनीचं कौतुक होण्यापेक्षा तक्रारीच जास्त होत्या . आम्ही तिला बाकीच्या गुरांबरोबर चारायला घेऊन नाही जायचो. त्यामागच कारण मला नाही माहीत ,कदाचित बाकीच्या गुरांच्या तुलनेत तिची चालण्याची आणि खाण्याची सवय वेगळी असेल. रोज सकाळी-सकाळी ७-८ वाजता तिला एकटीला पायखुटी घालून चरायला पाठवायचो. आणि बाकीच्या कामांबरोबर मला आणखी एक काम असायचे ते म्हणजे रोज शाळेतून आलं की मैनीला शोधून आणून बांधा. बर्‍याच वेळी कुणाच्या शेतात पीक खाण्यावरुन तक्रारीपण यायच्या. पण असं खूप कमी वेळा झालेलं. खरतर तिला गुरांबरोबर नेण्यास काही हरकत नव्हती. जर उंटावरुन शेळ्या हाकणं शक्य असेल तर घोडी वरुन गायी ,वासरं आणि शेळ्या हाकणं नक्कीच जमलं असतं.पण हे खूप आधी सुचायला हवं होतं. आता काय ’बोलाचाच भात आणि बोलाचिच कढी’.
तिला एकदा पिल्लू (घोडा) झालं ,खुप सुंदर होतं.तेव्हा १५-२० दिवसांसाठी तिला घरीच चारा घालायचो. त्यावेळी आमच्या शेजारची मुलं येऊन तिच्यावर बसायची. ते तिचं शेवटच पिल्लू होतं.त्यानंतर तिला कधीच पिल्लू झालं नाही. खुप वृद्ध झाल्याने ती गेली. कदाचित ते शेवटचं पिल्लू पाळण्याचा घरचे विचार करायचे परंतु पैशाच्या अडचणीमुळे आम्ही त्याला १ वर्षाच्या आतच विकलं. आता असं वाटत की नसतं विकलं त्यावेळी तर किती बरं झालं असतं,किती मोठा घोडा असता आज आमच्याकडे. परंतु ते पिल्लू घरी ठेऊन घेतले असते तर त्याला सांभाळायचा प्रश्न आलाच असता, न जाणे कदाचित मलाच शाळा सोडून त्याला घेऊन गुरांमागे जावं लागलं असतं. आणि आपल्या नातवांना शाळा सोडावी लागू नये म्हणून पण कदाचित त्याला घरी ठेवण्याचा विचार आजोबांनी सोडून दिला असावा. नाहीतर नंतर छोटं घोड्याच पिल्लू घेणं हे काय येवढं अवघड नव्हतं. माझ्या माहितीप्रमाणे आजोबांनी आमच्या नातेवाईकानां ९-१० तरी घोडे घेऊन दिले असतील.
असो तर, माझी घोड्यावर बसण्यापेक्षा पण घोडा घेण्याची तीव्र इच्छा आहे आणि घोडा घेणं एवढ पण अवघड नाही. अगदीच काय जगातले सगळे घोडे नष्ट नाही झाले. मला माहीत आहे कुठे मिळतील ते. धनगर आणि घिसड्यांकडे सहजासहजी मिळतील. एकदा प्रयत्न करते आजोबांना सांगण्याचा बघुया काय म्हणतायेत ते. आजोबांनी ऎकलं तर मजाच येईल ,रोज रोज हॉर्स रायडिंग करायला मिळेल !!!!!!!